Author : NARAYAN DHARAP
ISBN No : 9788177869873
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : Saket Prakashan
नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणार्या पिढीला नवीन असले, तरीही आपल्या रहस्यमय लेखनाने त्यांनी एक काळ गाजवला होता. गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत.
नारायण धारपांच्या कथा ‘भय’ या विकाराची अनेक रूपे घेऊन येतात. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शारीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रूर पीडा देणार्या जीवसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवी शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे.
‘440, चंदनवाडी’ ही धारपांच्या गाजलेल्या भयचकित कादंबर्यांपैकीच एक. या कादंबरीत शुभ आणि अशुभ यांचा संघर्ष आहे. एक अति प्राचीन अघोरी शक्ती आणि क्षणमात्र श्वास रोखून धरणारे प्रसंग हे या कादंबरीचे प्रमुख वैशिष्ट्य. या शक्तीच्या विरोधात अनेक तंत्रशक्ती, मानसशक्ती, धर्मशक्ती उभ्या आहेत. धारपांच्या भयकथांचे खास वैशिष्ट्य येथेही पहावयास मिळते. कथा पूर्ण वाचून झाल्यावर वाचकाच्या शूचितेवरचा, मांगल्यावरचा, मानवाच्या मानवतेवरचा विश्वास अधिकच दृढ होतो.
या कादंबरीतील सर्व घटना वाचकांची रहस्य जाणून घेण्याची उत्कंठा शिगेला पोहोचवितात. यातील गूढ आणि रहस्यमय घटना वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.