Author : NARAYAN DHARAP
ISBN No : 9789352203949
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : Saket Prakashan
“श्री. जानोरीकर यांस,
आपला एक हितचिंतक या नात्याने मी आपल्याला हे पत्र लिहीत आहे. शहरात ‘शिवपार्वती सोसायटी'समोर आपला बंगला आहे. गेली बरीच वर्षे हा बंगला वापरात नाही. माझ्या पाहण्यात आलं आहे की, आपल्या या बंगल्याची मागची आणि पुढची अशी दोन्ही दारं उघडी आहेत.
कॉलनीतली मुलं तिथे आसपास खेळत असतात. खेळ म्हणून किंवा कुतूहल म्हणून मुलं तुमच्या बंगल्यात जाऊन काही नासधूस करण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपण प्रत्यक्ष येऊन दारं- खिडक्यांची तपासणी करून सर्व व्यवस्थित बंद करून जावे. आत आपली काही चीजवस्तू असेल तर तीही व्यवस्थित आहे की नाही याची खातरजमा करून घ्यावी.
एक सावधगिरीची सूचना- पत्रलेखकाचा असल्या गोष्टींवर विश्वास नाही; पण माझ्या कानांवर आपल्या या रिकाम्या वास्तूविषयी काही चमत्कारिक गोष्टी आल्या आहेत. स्पष्टच लिहायचं तर या वास्तूत दुष्ट, अभद्र, पापी अशा शक्तींचा वावर आहे. ही वास्तू पछाडलेली आहे. कृपया या सूचनेला योग्य ते महत्त्व द्या. बंगल्याला भेट द्यायला याल ती वेळ भरदिवसाची निवडा. बरोबर कोणीतरी धीराची, समयसूचकता असलेली व्यक्ती असू द्यात. एकट्याने त्या वास्तूत जाण्याचे धाडस करू नका. माझी शंका खोटी ठरली तर सर्वांत जास्त आनंद मलाच होईल; पण सावधगिरी कधीही फुकट जात नाही. कृपया हे ध्यानात ठेवा.
आपला,
एक हितचिंतक."