Author : ACHAUT GODBOLE
ISBN No : B07CXWBBH2
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : BIOGRAPHY
Publisher : Manovikas Prakashan
अच्युतच्या या पुस्तकाने मला चकित केलं आहे .... अच्युतचं सगळं व्यक्तित्व अफाट आहे...
....अफाट म्हणजे किती अफाट?... कुठं शहाद्याचे आदिवासी.. आणि कुठं ते अमेरिकेतले सॉफ्टवेअर कंपन्यांचे प्रमुख मालक... कुठं सोलापूरच्या थेटरात जाऊन सिनेमे पाहणारा पोरगा, आणि कुठं ... कम्प्युटर क्षेत्रात घुसणारा!...आणि अशी पुस्तकं लिहिणारा, की जगभर ती टेक्स्टबुकं म्हणून वापरली जातात! त्याचं ‘अच्युत’ हे नावही ‘अचाट’ला जवळचं आहेच...
.... ‘मुसाफिर’ अगदी म्हणजे अगदीच वेगळं लिहिलेलं...आतून आलेलं... शहाद्याच्या वेळेस तो दहा दिवस तुरुंगात गेला,....काय ग्राफिक, भयंकर चित्र उभं केलंय त्यानं...दहा दिवसांत सगळं तुरुंगविश्व उलगडणाऱ्या लेखकाची किती भेदक आणि व्यापक नजर...तीच गोष्ट वेश्यांच्या वस्तीबाबत...थक्क करणारं लिखाण...या सगळ्यामागे दिसणारी त्याची व्यापक आत्मीयता....
या लिखाणाला वा: म्हणायला धीर होत नाही. कारण तो वा: पलीकडचा आहे.....
....मुलाच्या आजारपणाबद्दल जे लिहिलंस, ज्या दु:खातून तुम्ही गेलात, जातही असाल. नुसते दु:ख करीत न बसता एक संस्था उभी केलीत. हे सगळं वाचून अवाक् झालो आहे! आता तू माझा फक्त मित्र राहिला नाहीस, तर ‘शिकवणारा’ मित्र झाला आहेस!
-अनिल अवचट
सुप्रसिद्ध पत्रकार, लेखक
...........................................................................
..हा ग्रथ वाचताना सिंदबादच्या सात सफरींची आठवण व्हावी इतका तो अद्भुतरम्य आणि विविधरंगी आहे. तो विविधरंगी होण्याचे कारण गोडबोल्यांनी आदिवासींच्या तुरुंगात जाण्यापासून ते सॉफ्टवेअर क्षेत्रात अत्युच्च जागी पोहोच्ण्यापर्यंत सारे काही....केले आहे, जे एकाच माणसाने केले असेल हे खरेच वाटत नाही...
‘जगावे कसे’ या विषयावर...संदेशबाजी न करता...असा मार्ग काढणे शक्य आहे, मात्र त्यासाठी माणूस अत्यंत बुध्दिमान हवा, रसिक हवा, मानवतावादी हवा, चिकित्सक हवा, कष्टाळू हवा, थोडक्यात म्हणजे तो अच्युत गोडबोले हवा!!
अच्युत गोडबोले यांचे हे आत्मचरित्र अद्भुतरम्य आहे, कारण सॉफ्टवेअरच्या अवघड, स्पर्धात्मक क्षेत्रात मोठी मजल मारणारा हाच माणूस विद्यार्थीदशेपासून अर्थशास्त्र, संगीत, साहित्य, जागतिक राजकारण, समाजशास्त्र या विविध विषयांचा पुढे त्यावर पुस्तके लिहिण्याइतका सखोल अभ्यास करतो, कधी समाजकार्य करताना तुरुंगातही जातो हे सगळं लोकविलक्षण आहे. आपण गाजवलेल्या अनेकविध क्षेत्रांविषयी सविस्तर माहिती देतानाच त्यातील हृद्य आणि नाट्यपूर्ण प्रसंगही लेखकाने मांडले आहेत. एवढेच नाही तर उत्तम मॅनेजमेंटही मानवतावादी दृष्टीकोनामुळेच शक्य होते, हा बहुमोल संदेश आजच्या, यशाची शिखरे गाठू पाहणाऱ्या तरुणांना दिला आहे. एक अत्यंत वाचनीय, माहितीपूर्ण आणि ‘सकारात्मक जगण्याची कला शिकवणारे’ उपयुक्त पुस्तक!
– रत्नाकर मतकरी
सुप्रसिद्ध नाटककार, लेखक
अव्वल दर्जाची बुद्धिमत्ता, अफाट उर्जा, कोणत्याही गोष्टीचा थेट मुळापर्यंत घुसून शोध घेण्याची असोशी ही अच्युत गोडबोले यांची काही वैशिष्ट्येच त्यांचे असाधारण असणे दाखविण्यास पुरेशी आहेत. पण शोधल्या-समजावून घेतलेल्याचे आंतरिकीकरण करून ते अतिशय सोप्या भाषेत इतरांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची असोशी आपल्यासाठी मला फार मौलिक वाटते. हा माणूस अफाट आडवं-तिडवं समरसून जगलेला आहे. धारावी, शहादा ते कॉर्पोरेट विश्वातील सर्वोच्च स्थानीचे आयुष्य असा त्यांच्या जगण्याचा विस्तीर्ण पट आहे. स्वार्थ, स्पर्धा, पिपासा यांच्या दुनियेत वावरूनही त्यांची सहृदयता, पीडितांबद्दलची कणव अभंग आहे. फार कमी मराठी माणसांच्या वाट्याला या प्रकारचं समृद्ध आयुष्य आलं असेल. मुख्य म्हणजे, त्यातले अगदीच कमी ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याच्या भानगडीत पडतील. गोडबोले यांच्या आत्मशोधाच्या अफाट दिशांचं महत्व हे यासाठी. जगण्याच्या, ज्ञानाच्या इतक्या क्षेत्रात इतकी खोलवर बुडी मारून ते सगळं इतकं सोपं करून सांगणारा आणखी कोणी आज मला तरी दिसत नाही.
– रंगनाथ पठारे